भारत माझा देश आहे
*राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?*
- राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते.
- पण आजवर ती कुणी लिहिली, तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील.
- परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते.
- अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही.
- मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.
- बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की, त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता.
- मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही.
- पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना, विद्वानांना, पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना, शिक्षणमंत्री, साहित्यिक, लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल!
- परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो!
- *आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली.*
- परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.
- त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली.
- शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.
- केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
- पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी.
- या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.
- तसेच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला.
- पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.
- २६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.
- आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी.
- सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच.
- यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.
*ही माहिती मला आवडली ती सर्वांना कळावी म्हणून पाठवत आहे*
संकलन : - विनोदकुमार महाजन,
पुणे.
दिनांक 28/12/2020
Comments
Post a Comment