सोनारीचा काळभैरवनाथ

 सोनारीतील नाटेश्वर पंथीय गोरक्षपीठ ….


उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील श्री.क्षेत्र सोनारी हे गांव श्री.काळभैरवनाथ आणि श्री.जोगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सोनारीचा भैरवनाथ महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता आहे. घरात शुभकार्य झालं की, आवर्जून काळभैरवाच्या दर्शनासाठी येतात,गुलाल खोबरं उधळून 'चांगभंलं' म्हणून जयजयकार करतात. 


सोनारीचं मुख्य आकर्षण काळभैरव मंदिर, काळभैरव जोगेश्वरी विवाह सोहळ्याची यात्रा, काळभैरवाचा रथ असले तरी फारसं प्रसिद्ध नसलेलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे काळभैरव मंदिर परीसरात असणारे गोरक्षनाथ पीठ, या पीठाची गुरूगादी आणि तळघरात असलेले भद्रकाली मंदिर!


सोनारीत गोरक्षनाथ यांनी स्थापन केलेल्या नाथपंथाच्या नटेश्वरी शाखेचे हे पीठ भारतातील एक प्रमुख पीठापैकी आहे. गोरक्षनाथांचा कालखंड समकालीन साहित्याच्या आधारे अनेक संशोधकांनी नवव्या शतकाच्या मध्यकालखंड मान्य केला आहे. अभिनवगुप्तने हा कालखंड १० शतकाच्या पुर्वीचा तर इतिहास संशोधक नागेंद्र नाथ यांनीही हा कालखंड ९ व्या ऩंतर मांडलेला आहे. गोरक्षनाथ यांनी भारतभर भ्रंमंती केली आणि शिव संप्रदयाची शाखा म्हणून मत्सेंद्रनाथांनी स्थापलेल्या नाथसंप्रदयात अनेक सुधारणा घडवल्या. गुरूभक्ती हा नाथसंप्रदयाचा आत्मा होती व आहे. मत्सेंद्रनाथाचा हा नाथ भक्तीचा शिवोपासक अविष्कार त्यांनी भारतातील अनेक पंथोपंथ आणि संप्रदयात पोचवला. 


हठयोगप्रदिपका, सिद्धिसिधांतसंग्रह, गोरक्षसिद्धांतसंग्रह आणि गोरक्षपद्धती अशा आदी ग्रंथातून गोरक्षनाथांचा विचार भारतभर प्रसारीत झाला. नाथसंप्रदय हा अंहिसावादी संप्रदाय असल्यामुळे व त्याचा प्रमुख प्रणेत्याचे  गोरक्षण हे नांव  वैदिकांच्या यज्ञसंस्थेच्या विरोधी असेच होते. त्यामुळे नाथसंप्रदाय हा वेद विरोधी आहे,असे मत हजारीप्रसाद द्विवेदी यांनी मांडलै आहे. 


गोरक्षनाथ भारत भ्रमण करत असताना त्यांनी सोनारीस भेट दिली असण्याची मोठी शक्यता आहे. कारण गोरक्षनाथोत्तर काळात ज्या प्रमुख १२ शाखांची निर्मिती झाली त्यातील महत्वपुर्ण अशा नाटेश्वरी पंथाचे वा शाखेचे पीठ आणि तेही गुरूगादीसह सोनारीत अधिष्ठित आहे. दंतकथा अशी आहे की, पुर्वी शिव संचलित १२ आणि गोरक्ष संचलित १२ पंथ होते आणि यांच्यात सतत संघर्ष होई. हा संघर्ष टाळून अंहिसात्मक शिवभक्ती प्रस्थापित करण्यासाठी गोरक्षनाथांनी शिव संचलित ६ आणि स्वत:चे ६ पंथ विसर्जीत करून १२ पंथांची स्थापना केली, त्यात नाटेश्वरी हा पंथ आहे. नाटेश्वरी हा पंथ गोरक्षनाथांच्या काळातच निर्माण झाला म्हणजे गोरक्षनाथांचा शिष्य लक्ष्मणनाथ यांने या पंथाची स्थापना पंजाबमधील टिला या ठिकाणी करून मठ स्थापन केला. त्याच्या दोन शाखा निर्माण झाल्या, एक नाटेश्वरी आणि दुसरी दरीयाशाखा! विशेष म्हणजे दरयानाथी नावांची नाथजोग्यांची गोरक्षकालीन स्वतंत्र शाखा असून त्यात त्यात सिंध प्रांतातील अनेक नाथपंथीय मुस्लिम नाथसंप्रदायींचा समावेश होतो. 


गोरक्षनाथ अथवा त्यांचा शिष्य लक्ष्मणनाथ यांनी सोनारीला येण्याची कारण काय असावे? असा प्रश्न पडणे अगदीच स्वाभाविक आहे. याचे कारण गोरक्षपुर्व काळापासून सोनारीत विराजमान असलेले श्री.काळभैरव हे देवस्थान आहे. 


श्री. कालभैरव ही देवता मग ती सोनारीची असो वा भारतातील कोणत्याही स्थळी विराजमान असणारी,  ती एक स्वतंत्र देवता असून शैव आणि शाक्त पंथातील असूनही भैरवच्या कापालिक संप्रदायाने तंत्रोपासनेच्या रुपात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आजही जोपासले आहे. 


भैरव म्हणजे क्रोधीत अवस्थेतील प्रत्यक्ष शिव म्हणजे महादेव ! याबाबची धार्मिक अख्यायिका अशी की, पूर्वी शिव आणि ब्रह्मा हे दोघेही पंचानन होते. मात्र याच कारणामुळे ब्रह्मा स्वतःला शिवाच्या बरोबरीचा असल्याचे समजून शिवाच्या कार्यात ढवळाढवळ करू लागले.शिव यामुळे क्रोधीत झाले आणि शिवाच्या नखापासून भैरवाची म्हणजे क्रोधीत अवस्थेतील शिवाची निर्माती झाली आणि त्याने ब्रह्माचे एक शीर कापून टाकले. ते शीर भैरवाचा हाताला चिकटले ते कायमचेच ! 


भैरवाने ब्रह्माचे शीर कापल्यामुळे भैरवास ब्रह्महत्येचे पातक लागले आणि त्यास स्मशानात राहण्याचा आदेश देण्यात आला. तेंव्हापासून भैरव हा स्मशानात राहू लागला आणि हाताला चिकटलेल्या मानवी कवटीचे त्याने भिक्षापत्र केले  आणि त्यातच तो अन्न सेवन करू लागला ! कापालिक पंथाची सुरुवात येथूनच असल्याची मान्यता आहे. 


भैरव याचा अर्थ भयप्रद असणारा ,भय निर्माण करणारा ,उग्र रूप धारण असलेला ! शिव हा मानवी भाव भावनांचे प्रकटीकरण त्याच्या विविध रूपातून दर्शवत असतो , भैरवाच्या रूपाने तो मानवी मनातील क्रोध ,उग्र प्रवृत्ती यांचे प्रकटीकरण करतो. या भैरवाचे एकूण ६४ प्रकार आहेत , मात्र हे सर्व आठ प्रमुख शाखात विभागले गेले आहेत , त्यांना अष्टभैरव असे म्हणतात. या पैकी काळ भैरव हा या सर्वांचा प्रमुख असून , त्याच्या अधिकारांतर्गत आठ दिशांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे आठ भैरव करत असतात ,अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

भैरव हा काळ नियंत्रण करू शकत असल्यामुळे तो संरक्षक समजला जातो , म्हणून अशा देवतांची ठाणी क्षेत्रपाल देवता म्हणून प्रमुख देवतेच्या शेजारी असतात. मात्र वस्तुतः अशाच देवतांच महात्म्य एवढे मोठे असते कि ,मुख्य देवतेबरोबर त्यांचाही मोठा जनाधार असतो.


महाराष्ट्रातील सर्वच शैव या देवतेशी तादाम्य पावणाऱ्या क्षेत्रपाल देवतांनी स्वतःचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा, म्हसोबा आदी देवता प्रचंड मोठा शिष्य संप्रदाय असणारया आहेत. तुळजापुरचा काळभैरव काळोबा या नावाने तर टोळभैरव टिळोबा नावाने ही ओळखला जातो कारण तो एक लोकदेव आहे. 


श्री काळभैरवाची मूर्ती अशीच उग्र रुपी असून  तिला चार हात आहेत. या हातात  खड्ग, डमरू, त्रिशूल आणि भिक्षापात्र आहे ,जे अर्थतच मानवी कवटीचे प्रतिक आहे. म्हणून काळ भैरवास कापालिक किंवा महाकापालिक असेही म्हणतात. तात्रिक पंथात यापंथाचे स्वतंत्र अस्तित्व असून भैरव या देवतेस तिबेटीयन बौद्ध धर्मात देखील मान्यता आहे. अनेक जैन ग्रंथात सुद्धा भैरवाचे महत्व अधोरेखित केले आहे. भैरवी या देवतेस बौद्ध धर्मातील तांत्रिक पंथात माया या देवतेच्या रुपात स्वीकारले आहे. बौद्ध धर्मातील वज्रयान या पंथातील तांत्रिक विश्व पूर्णतः भैरव या देवतेने व्यापून टाकलेले आहे.मुळात वेदविरोधी सर्वच संप्रदयांनी भैरवास आपलेसे केले आहे, हे खूप बोलके आहे. 


उज्जैन, बनारस या ठिकाणी असणारी भैरव मंदिरे भारतभर प्रसिद्ध आहेत. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत आज काळभैरवाच्या साधनापरंपरेचे स्वरूप बदलले असले तरी तुळजापुरातील काळभैरवाचे स्वरूप शाक्तपीठाच्या सान्निध्यामुळे कायम राहीले आहे. 


तुळजापुरच्या काळभैरवास वर्षभर आणि विशेषत: अश्विन अमावस्येला त्याच्या उग्र प्रवृत्ती नुसार त्यास मद्य, गांजा आणि मांस याचा नैवेद्य अर्पण केला जातो. अशीच स्थिती उज्जैनच्या काळभैरवाची आहे. पण सोनारीच्या भैरवनाथ मंदिरात अशी कोणतीही परंपरा नाही. विशेष म्हणजे  इथल्या काळभैरवाचे पुजारी ब्राह्मण आहेत. 


सोनारीच्या भैरवनाथाच्या आजच्या साधना परंपरेवर गोरक्षनाथांचे शिष्य लक्ष्मणनाथ यांच्या नाटेश्वरी पंथाचा प्रभाव आहे. नाटेश्वरी हा नाथपंथ महाराष्ट्रात प्रभावी असल्याच्या पुरावा महानुभावांच्या 'षट्दर्शनविवर्णन' या ग्रंथात आढळतो. 


नाटेश्वरी लक्ष्मणपंथी | आणि पार्वतीनाथी |

अभंगनाखी | कापिल विभूतीये || 


महानुभावी 'षट्दर्शनविवर्णन' या ग्रंथाखेरीज, महानुभावींच्याच 'दर्शनप्रकाश' या ग्रंथातील उल्लेख सोनारीच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. 


नाटेश्वर भैरव संतनाथ | जालंधरी वाघळी अवघटी अघड कळंक पंथ | 

अघोर मच्छ आळपाळी महिंद्रनाथ | घोडाचुडी|| 


महानुभावांनी नाथजोग्यांवर टिकात्मक लिहीले आहे. त्यांनी वर्णन केलेले ' नाटेश्वर भैरव' हे सहचर्य मध्ययुगीन महाराष्ट्रीय भक्तीभाव क्षेत्राचे वर्णन म्हणून मान्य केले तर भैरवाचा सबंध त्यांनी नाटेश्वरी पंथासह स्पष्ट केला आहे. 


काळभैरवाची उपासना ही काळभैरव स्वत: कापालिक असल्यामुळे त्यात शैव शाक्त संपद्रयातील अनेक विधीसह नक्कीच असणार! गोरक्षनाथाने वज्रयान, सहजयान या तांत्रिक असवेल्या बौद्ध संप्रदयांना, शाक्त व शैव संप्रदयांची रूपे असलेल्या कापालिक नि वामाचारी तंत्रसाधनांना पर्याय देण्याचा प्रयत्न नाथसंप्रदयाच्या विचारातून दिला असला तरी नाथसंप्रदयात अंतर्भूत झालेल्या अनेक वामातारी साधकांनी आपले पुर्व संस्कार पुर्णपणे विसरले असल्याची शक्यता दुरापास्त आहे. रा. चिं.ढेरे त्यांच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात ' नाथयोग्यांच्या कक्षेतील अनेक योगीशाखात वामाचाराचे प्रचलन असून, मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून या तांत्रिक साधनेतील पंचमकारांचा आचार कांही अंशी रूढ आहे' ( पृष्ठ क्र. ४२) 


सोनारीच्या नाटेश्वरी पंखीय नाथजोग्यांच्या मठाच्या तळघरात भद्रकाली देवीचं ठाणं आहे. भद्रकालीची अख्यायिका अशी सांगीतली जाते की, सुवर्णासुर या असूरावर भैरवाने वार केले की त्याच्या रक्तातून सैन्य निर्माण होत असे. म्हणून भद्रकाली या शाक्त देवतेने ते रक्त प्राशन केले. भद्रकाली नंतर तिथेच सोनारीत स्थानापन्न झाली ती या नाथजोग्यांच्या मठाच्या तळघरात! मानवी रक्ताची तीची भुक पुढे परंपरेने नरबळी स्वरूपात शमवली असण्याची शक्यता कितपत असेल माहीत नाही. 


नाथपंथियांत सामिल होऊनही आपल्या पुर्वसंस्काराचा  हा भिषण असा वारसा आज राहीलेला नाही, पण तो कांही काळ असावा असे वाटते. 


गोरक्षनाथांचा वारसा इतिहासात कोणत्या नाथपंथिय जोग्यांनी सांभाळला हा मोठा विषय आहे. पण हा वारसा चक्रधर, ज्ञानेश्वर, अल्लम प्रभू, कबीर, गुरू नानक या महापुरूषांनी सांभाळून त्याची जोपसना करत हिंदु धर्माची उदार, अहिंसात्मक आणि सर्वसमावेशक अशी रचना करण्यात मोलाची भुमिका बजावली. 


सोनारीला कांही दिवसांपुर्वी भेट दिली. काळभैरवाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले आणि पुन्हा लिहाता झालो. 


© राज कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र