बोलते रहो
*सुखदुःख बोला*
✍️ २७७१
*विनोदकुमार महाजन*
✅✅✅✅✅
प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख असतंच असतं.
त्यातही सुख कमी आणी दुःख जादा.
वास्तविक पाहता खरा सुखी जगात कोण आहे हो ?
कुणीच नाही.
प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतंच ना ?
म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात ना ?
" जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुची शोधुनी पाहे !"
असो.
पण असं आहे की आपल्याला सुखदुःख हलकं करायला , मन अगदी मोकळं करायला कुठं तरी एक जागा हवी असते.
अगदी खांद्यावर डोके ठेवून मोठ्या विश्वासाने ढसाढसा रडायला सुध्दा एक नातं हवं असतं.
पण हल्ली झालंय काय तर माणूस अगदी कोत्या मनाचा होत चाललाय.वरचेवर व्यस्त झालाय.मनमोकळे बोलायला , हसायला खेळायला एक तर वेळच नाही.अथवा मनातलं सुखदुःख सांगायला कुणी विश्वासू नातंच नाही.
तर मग काय करायचं ?
मनातल्या मनात कुढत रहायचं अन् वरपांगी हसत रहायचं.
कारण दुखा:त साथ देणारे आणी खरी साथ निभावणारे किती भेटतात ?
" परदु:ख शीतल " मानून बघणारे बघेच जादा.
अथवा कुणापाशी विश्वासाने बोलावे अशी एखादी जागाच जगात नाही , अशी अवस्था.
म्हणूनच धनाने गरीब असले तरी चालेल पण मनाने नेहमी श्रीमंत असावं.
हीच खरी श्रीमंती.
एखाद्याला आर्थिक सहकार्य करा अथवा नका करू , पण त्याच्या संकट काळात निदान त्याला धीर , थोडा मानसिक आधार तरी द्या.
याला काय पैसा लागतो का हो ?
लोकसंख्या तूफान वाढली पण विश्वासु माणसं भेटणं खरंच दुर्मिळ झालंय.
अगदी पैसे देऊन विश्वासु माणूस कामाला मिळणंही दुरापास्त झालंयं.
मग मन मोकळं , हलकं कुणापाशी करायचा हा प्रश्न आहे.
विश्वासाने कुणापाशी बोलावं , मन हलकं , मोकळं करावं तर ?
गैरफायदा घेणारेही भरपूर असतात.
मग मन हलकं कसं करायचं ?
अगदी एखाद्याच्या मयताला गेलं तरी कुचंक , पादरं बोलणं ऐकून घ्यावं लागतं.
विनाकारणच ,
" *लागलाय भोगायला* "
असले दळभद्री अन् निकृष्ट शब्द ऐकून घ्यावे लागतात.
माणसं धनाने श्रीमंत असतात पण मनाने मात्र दळभद्री.
म्हणूनच नात्यागोत्यातला विश्वास ही संपत चाललाय.
मग मन हलकं कुणापाशी करणार ?
वास्तविक पाहता जीवनात मनमोकळे बोलायला , हसायला , खेळायला, लहान मुलासारखं, लहान वासरासारखं टनटना उड्या मारायला एक जागा हवी असते .
खरा मित्र ही जागा नक्कीच भरून काढतो.
माझा एक जवळचा आध्यात्मिक व खरा मित्र,लोकमतचे संपादक *उदयकुमार जैन* यांचे आणी माझे मित्रत्व शब्दातीत आहे.
दोन आत्म्यांचे खरे, पवित्र व शुद्ध, निरपेक्ष मित्रत्वाचे हे नाते.
एकमेकांच्या भेटीत साक्षात ईश्वर प्राप्तीचा आनंद होतो.
माझे एक आळंदीचे मित्र आहेत , *गणेश मुंगसे* नावाचे.
प्रत्येक गोष्ट , सुखदुःख आम्ही अगदी मनमोकळे बोलायचो .
अजून एक माझे जवळचे , नाथ सांप्रदायात श्रेष्ठत्व मिळवलेले , अनेक वर्षे खडतर तपश्चर्या केलेले , देशविदेशात अनेक वर्षे फिरलेले , रामराम स्वामी यांचे जीवनावर आधारित एक जबरदस्त मराठी चित्रपट निर्मिती करणारे, पत्रकार , डाॅक्टर , गुरूतुल्य व्यक्ती आहेत.
*अलखनाथ बापू.*
वय ८६ वर्षे.पण अजूनही लहान मुलासारखे टनटना उड्या मारतात.
मस्त मनमोकळे हसतात , खेळतात.
मलाही त्यांच्या जवळ गेले की , लहान मुलासारखे , वासरासारखे टनटना उड्या माराव्या वाटतात.
रूसवे , फुगवे सगळं सगळं मनासारखं बोलता येत त्यांच्या पाशी.
*नातं असावं तर असं.*
तसा माझा देशविदेशात भरपूर मित्र परिवार आहे.
पण सुखदुःख हलकं करण्यासाठीचे मित्र अगदी कमी.
*व्यंकटेश बाबर* नावचा माझा एक फौजी बालमित्र असाचं खरं प्रेम करणारा.
मला म्हणतो ,
तु *युगपुरुष आहेस रे* बाबा.
खरं खोटं देवच जाणे.
पिएसआय
*बबन हाजगुडे* ,
*राम आसबे* अशी
कितीतरी मित्रांची माझी लांबलचक जंत्री आहे.
कुणाकुणाची नांव लिहू ?
फ्लॅट सिस्टिम मधलं कोंदट शहरी जीवन जगणाऱ्या माणसापेक्षा त्या मानानं आम्ही खेड्यातली माणसं... मनसोक्त जगणारी , मनसोक्त गप्पा मारणारी.
मनसोक्त खरं प्रेम करणारी , मनसोक्त हसायला लावणारी,
चार शिव्या देऊनही पुन्हा एकमेकावर जीवापाड प्रेम करणारी ,
सुखदुःखात धावून जाणारी माणसं.
खोटंनाटं , बेगडी , वरपांगी , दिखावू ,नाटकी असल्या जीवनापासून नेहमी दूर राहणारी आणी भगवंतावरही खरं प्रेम करणारी माणसं भेटणं खरंच भाग्याचं लक्षण आहे.
माझे *सोनवणे वकील* नावाचे असेच एक मित्र आहेत.अगदी दिलदार आणी बिनधास्त व्यक्तिमत्व.
नाहीतरी मानवी जीवनात काय आहे हो ?
मस्त जगावं.
बिलंदर , अवलीया होऊन जगावं.
जगावर खरं प्रेम करावं.
अगदी निष्कपट.
पशुपक्षावर सुध्दा निष्पाप प्रेम करावं.
झाडं वेलीशी ही बोलावं.
*भगवंतावरही प्रेम करावं.*
आणी भगवंताला आनंद होईल म्हणून भगवंताचा
" *भागवत धर्म "*
जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी उभं आयुष्य वेचावं.
जेवढे मनमोकळे हसाल , खेळालं , सुखदुःख व्यक्त कराल तेवढं सुखी व्हाल.
हसणं सुध्दा खळखळून असावं. निरागसं.
वाहत्या पाण्याच्या खळखळत्या झ-यासारखं.
निखळं.निरागस ,
निष्पाप.लहान मुलासारखे.
हेच तर खरं आयुष्य.
हेच तर खरं निखळ प्रेम.
हेच तर सुखी जीवनाचं रहस्य.
आणी हेच तर खरं आत्म्याचं आत्म्यावरचं दिव्य प्रेम.
एकमेकावर करून तर बघा असं खरं , दिव्य प्रेम.
साक्षात भगवंत भेटल्याचा आनंद होईल.
उगीच एकमेकांची उणी दुणी काढून व्यर्थ आयुष्य घालवण्यापेक्षा मस्त कलंदर होऊन जगावं.
दुस-याचे अश्रू पुसणं नाही जमलं तरी चालेल पण दुस-याच्या डोळ्यात अश्रू येतील असं हेतुपुरस्सर नक्कीच वागू नये.
बोला मंजूर आहे ?
पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.
*जय हरी विठ्ठल*
*रामकृष्णहरी*
🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment