समजूतदारपणा

 *समजूतदारपणा...!*

✍️ २८६०


 *विनोदकुमार महाजन* 


🩷🌹🌹🌹


 *समजूतदारपणा...* 

प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा.


जसजसे वय वाढत जाते , तसतसा प्रत्येक व्यक्ती जवळजवळ ( कांही अपवाद वगळता ) जास्तीत जास्त समजूतदार बनत जातो.


आपल्या इच्छेविरुद्ध , आपल्या मनाविरुद्ध जरी अनेक गोष्टी घडत गेल्या तरी ? निमुटपणे सहन करत , सोशिकतेने जीवनात तडजोडी करत राहतो.


वास्तविक पणे समजूतदारपणा हा आयुष्यातील अनेक जटील प्रश्न ही सोडवण्यास सहाय्यक होतो आणी संबंधित व्यक्तीस अनेक प्रकारच्या उच्च स्थानावर घेऊन जातो.


पण ? समजूतदारपणा असायला , इच्छेविरुद्ध अनेक तडजोडी करायला सुध्दा , मनाचा खूप मोठेपणा लागतो.आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे , त्या व्यक्तीचा मेंदू अतिशय थंड असावा लागतो.

तरच समजूतदारपणा साध्य होतो.


गरम डोक्याची माणसे काय समजूतदारपणा दाखवणार ? आणी आयुष्यात काय तडजोडी करणार ?


पण अलिकडे झालंय काय तर ? उथळ विचारांची आणी गरम डोक्यांची माणसेच आपल्याला जागोजागी पहायला मिळतात.


अगदीच क्षुल्लक गोष्टीवरूनच , क्षुल्लक कारणावरून जागोजागच भांडण , तंटे , कुरबुरी पहायला मिळणं , हे याचंच प्रतीक आहे.


खोटं असलं तरी...

" *हम करेसो कायदा..."* अथवा..

" *मुझसे बडा कोई हो ही* *नहीं सकता..."*

ही अहंकारी वृत्ती समाजात जागोजागी थैमान घालते आहे.

आणी ? याचा परिणाम काय तर ?

चांगल्या माणसांनाही याचा निष्कारण आणी अत्यधिक त्रास सहन करावा लागतो आहे, मनस्ताप होतो आहे.


ब-याच वेळा समाजात असेही दिसते की ,

समजूतदार माणसे अथवा जागोजागी तडजोडी करणारी माणसे सुद्धा , ब-याच ठिकाणी , आखुड बुध्दीच्या आणी हेकेखोर माणसांमुळे पावलोपावली अडचणीत येत आहेत.


सगळीकडून संकटात सापडलेला , वैतागलेला अथवा आजारी व्यक्ती नाही समजूतदारपणा दाखवू शकत , अथवा नाही तडजोडी करू शकत , हे खरेही आहे.

आणी तो त्याचा दोषही नाही.


पण ? होतंय काय तर ?

अशा संकटात सापडलेल्या , वैतागलेल्या , आजारी माणसांना , गरज असते ती आधाराची.

आत्मीक सहानुभूतीची.

पण ? अशा लोकांना ही ब-याच वेळा समाजातील अथवा स्वकीय माणसेच समजावून घ्यायला आणी त्याला आधार द्यायला तयार नसतात.


कारणे कांहीही असोत.

पण समाजात आज जिकडे तिकडे वैतागवाडी पहायला मिळते आहे.

समजूतदारपणा , तडजोडी या गोष्टींचा अभाव जवळपास सगळीकडेच दिसतो आहे.


आणी ज्याच्याकडे समजूतदारपणा असतो , पावलोपावली तडजोडी करण्याची तयारी व कुवत असते ?

अशा माणसांना ही कोणीच समजावून घेत नाही.उलटपक्षी त्यांच्यावरच भयंकर चिखलफेक केली जाते , हे पण दुर्देवचं म्हणावे लागेल.


एक काळ असा होता की , समजूतदार माणसांची समाजात खूप कींमत तर होतीच.

शिवाय त्यांचा समाजात आदरयुक्त दरारा ही होता.


पण आता या गोष्टी दुर्देवाने नामशेष होऊ लागल्या आहेत का ? असे वाटते.


एक तर समजुतदारपणाचा अभाव अथवा ? ज्याच्याकडे समजुतदारपणा आहे ? त्यांची कींमत शून्य...

असेच विदारक चित्र ब-याच ठिकाणी आपणाला पहायला मिळते.


समाज आणी समाजमन वेगाने कुठे चालले आहे ? तेच हल्ली कळेनासे झाले आहे.


भौतिक सुखं वाढली , आणि ती सगळी सुख मिळवण्यासाठीची दगदग धावपळ वाढली.अनायासे पैशाने विकत मिळणारी सुखं मिळवण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष वाढला.


त्यामुळेच ब-याच जणांच मानसिक स्वास्थ्य हरवत चाललं.

साहजिकच चीडचीडेपणा वाढला.

त्यातूनच समजूतदारपणा , तडजोडी या गोष्टी कालबाह्य ठरू लागल्या.


आज सामाजिक गणितही पैशावरच मांडली जाऊ लागली आहेत.

ज्याच्याकडे भरगच्च पैसा ? तो सुखी ही सामाजिक धारणा ही वाढीस लागली आहे.

त्यामुळे सद्गुण , चांगुलपणा याची हळूहळू कींमत कमी झाली , अथवा सद्गुणांचीच पायमल्ली झाली ?

असं म्हणता येईल का ?


मग ही सामाजिक विकृती आहे की ? सामाजिक विकास ? की सामाजिक अंध:पतन ?


अनायासेच सुसंस्कृत पणाचा अभाव जागोजागी जाणवू लागला.

त्यातूनच एकमेकांबद्दल ची आत्मीयता संपत चालली.

त्यामुळे नात्यातील दुरावा ही वाढत चालला.


मग ? अशा विकृत समाज रचनेमध्ये चांगुलपणा , सद्गुण याला कोण कींमत देणार ?


आणी मग ? कितीही तडजोडी केल्या अथवा समजुतदारपणा दाखवला तर ?

त्याची कींमत तरी कोण ठेवणार ?


पूर्वीचे हास्याचे कारंजे उडवणारे जागोजागीचे आनंदी वाडे जवळपास मोडकळीस आले आणी ? माणसं वरचेवर ह्रदय शून्य बनत चालली.


त्यातच पुन्हा फ्लॅट संस्कृती वेगाने उदयास आली , आणी ?

आत्मीयता , आपुलकी नावाची चिजच इतिहास जमा झाली , अथवा होत चालली ?

अशी दयनीय सामाजिक अवस्था आज झाली.


हळूहळू शहरही भकास आणी उदास होत गेली.

खेडी बरी होती , असं म्हणत होते , पण ?

तिथेही आता...

फक्त पैशाचीच गणीतं गृहीत धरली जाऊ लागली.


पुर्वी एक जुनी म्हण होती...

 *विद्वान सर्वत्र पूज्यते*

पण ही म्हणचं आज जवळपास कालबाह्य झाली आणी...

 *धनवान सर्वत्र पूज्यते* 

अशी विचित्र आणी विकृत सामाजिक मानसिकता तयार झाली.


आज जो तो सुखं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे , खोट्या सुखाच्या मागे ही धावतो आहे.

प्रत्येकालाच सुखी व्हायचं आहे , म्हणून प्रत्येक जण पळतोय.

पण ?


ख-या सुखाची व्याख्याचं माणूस हरवून बसलायं तर मग तो ?

खरा सुखी कधी आणी कसा होणार ?

हाच आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे , आणी हा किमान आज तरी अनुत्तरित प्रश्न आहे.


कारण ?

 *ख-या सुखाची चावीच* आज माणूस हरवून बसलायं...हे मात्र नक्की खरे आहे..


मग अशा भयंकर वातावरणात , ख-या समजूतदार माणसांना तरी कोण विचारणार ?

उलटपक्षी...?

समजूतदार माणसेच जर समाजात टिंगलीचा विषय ठरत असतील अथवा त्यांनाच जागोजागी प्रताडीत , अपमानित केले जात असेल तर ? मात्र ?

हा समाज नक्कीच विनाशाकडे वाटचाल करतो आहे , असे समजावे...


एखाद्याच्या चांगुलपणाची कींमत नका करु...पण त्यांना कमीतकमी अपमानित तरी केले जाऊ नये...

एवढीच या निमित्ताने अपेक्षा करतो.


असो...

 *कालाय तस्मै नमः* 


🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म